रब्बी हंगामात पिकांची निवड आणि नियोजन कसे करावे?
1. जमिनीची योग्य निवड आणि मशागत :- रब्बी पीक हे जमिनीच्या गुणवत्तेनुसार घेतले जाते. जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन रब्बी पिकासाठी फायदेशीर ठरते. जमिनीची मशागत करताना एक वेळेस खोल नांगरणी नंतर वरून 1-2 पाटा फिरवणे आवश्यक आहे. जमिनीत सेंद्रिय खत टाकले असेल तर तुमचे पीक जोमदार येईल.
2. पीकाची योग्य निवड :- शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात योग्य पीक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. पीक असे निवडा की कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरगोस उत्पन्न देईल.
रब्बी पिक | पिकांन विषयी |
---|---|
गहू | गहू हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे तृणधान्य आहे आणि यात खूप उत्तम दर्जाचे प्रकारही आहेत. योग्य प्रकार निवडून तुम्ही गव्हाचे उत्पन्न घेऊ शकता. गव्हासाठी 3-4 वेळा पाणी भरावे लागते. गहू हे थंड आणि कोरड्या हवामानासाठीही अनुकूल असतात. |
हरभरा | बहुतेक शेतकरी रब्बी हंगामात हरभरा पेरणीला महत्त्व देतात. कारण हरभरा हा कमी पाण्यात आणि अल्प उष्णतेतही चांगले उत्पादन देतो. मार्केट भावही चांगला असतो. म्हणून हरभरा रब्बी हंगामात फायदेशीर ठरू शकतो. |
कांदा | हे पीक रब्बी हंगामात घेतले जाणारे हमखास उत्पन्न देणारे हे पीक रब्बी हंगामात घेतले जाणारे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकासाठी हवामानाचा अंदाज पाहून योग्य फवारणी आणि पाण्याची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. कांद्याला बाजारातील मागणी पाहता हे पीक भरगोस उत्पन्न देणारे पीक मानले जाते. |
मोहरी | रब्बी हंगामात तेलबिया पीकाची निवड ही योग्य आहे; या पिकासाठी थंड हवामान लागते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा थंड हवामानाचा मानला जातो, म्हणून रब्बी हंगामात मोहरीची निवड करणे योग्य मानले जाते. |
3. बियाण्याची योग्य निवड आणि त्यांच्यावर प्रक्रिया :- बियाणे निवडताना ज्या बियाणांची उगवण्याची शक्ती ही 80% पेक्षा जास्त असलेल्या बियांची योग्य निवड करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, किडकनाशकापासून पिके वाचवण्यासाठी पेरणीपूर्वी थायरम, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करून बियाणे मिश्र करून संरक्षित करावीत.
मग नंतर योग्य वेळ आणि हवामान अंदाज पाहून शेतात त्यांची पेरणी करावी, जेणेकरून पेरलेल्या बियाण्यांची मर होणार नाही. आणि योग्य बियाणे हे उतरतील.
पेरणीचे योग्य नियोजन कसे करावे
1. पेरणी करण्याचा योग्य कालावधी :-
शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामात हवामानाचा अंदाज पाहून लवकर पेरणी केल्याने पीक उत्पन्नात नक्कीच वाढ दिसते. गहू आणि हरभऱ्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणीसाठी सर्वोत्तम हवामान काळ मानला जातो.
शेतकरी बांधवांनो, उशिरा पेरणी केल्यास पिकांची योग्य वाढ होत नाही आणि त्याचा परिणाम हा येणाऱ्या उत्पन्नात घटाच्या स्वरूपात दिसून येतो.
2. गहू आणि हरभरा पेरणीची योग्य पद्धत :-
शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामात पेरणीची योग्य पद्धत वापरली तर याचा फायदा तुम्हाला उत्पन्नात पाहायला मिळेल. पिकांचे योग्य अंतर ठेवून पेरणी करणे महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन घेऊन स्वयंचलित बीजण यंत्राचा वापर केल्याने वेळ आणि शेतात लागणारा खर्चही वाचतो.
- गहू :- शेतात गहूची पेरणी करताना ओळींमधील अंतर हे 20-25 सेमी असणे आवश्यक आहे. त्यामुळे गहू दाट होणार नाही आणि योग्य हवा, खत, ऊन, पाणी झाडांना मिळेल.
- हरभरा :- हरभराची पेरणी करताना ओळींमधील अंतर हे 30-35 सेमी असणे आवश्यक आहे.
पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे
रब्बी हंगामात घेण्यात येणारी पिके ही पाण्यावर जास्त अवलंबून असतात. प्रत्येक पिकाला योग्य नियोजन करून पाणी दिले गेले पाहिजे. यासाठी तुम्ही ड्रीप, स्मार्ट सिंचन प्रणालीचा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन करू शकता. पिकांना 3-4 वेळा पाणी भरण्यासाठी गरज असते.
गहू पिकाला पहिले पाणी हे गहू पेरल्यावर लगेच द्यावे लागते, नंतर त्याच्या वाढीसाठी आणि त्यानंतर गव्हाचे दाणे भरताना पाणी भरावे लागते. त्याचप्रमाणे हरभऱ्याला ही 2-3 वेळा पाणी भरण्याची गरज असते.
यासाठी योग्य टप्पे करून पाणी भरावे लागते. शेतात जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर पिकांना नुकसान होऊ शकते. याचा परिणाम हा तुमच्या येणाऱ्या उत्पन्नावर पाहायला मिळेल.
शेतात खताचे योग्य नियोजन कसे करावे
1. शेतात रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खातांना प्राधान्य दिल्याने तुमच्या शेतातील मातीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते.
2. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करावा जेणेकरून मातीची गुणवत्ता घटणार नाही. यासाठी तुम्ही नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus), व पालाश (Potassium)चे योग्य प्रमाणात वापरू शकता.
- गहूसाठी तुम्ही 120:60:40 किग्रॅ/हेक्टरी वापरू शकता.
- हरभऱ्यासाठी तुम्ही 20:40:20 किग्रॅ/हेक्टरी वापरू शकता.
3. शेतात पिकांसाठी खतांच्या नियोजनात झिंक, सल्फर व बोरोनसारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरल्याने तुमच्या उत्पादनाची हमखास वाढ होईल.
पिकांचे संरक्षण कसे करावे
1. हरभरा पिकावर जास्त करून “चणा खवले किडीचा” प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी शेतकरी बांधव इमामेक्टिन बेंझोएटचा योग्य प्रमाणात वापर करून त्या रोगावर नियंत्रण मिळवू शकतात. किंवा चांगल्या कंपनीच्या कीटकनाशकांचा ही शेतात पिकावर छिडकावं करू शकता.
2. गव्हावर “करपा रोग” होण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर पिकावर बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून गव्हाचे नुकसान होणार नाही.
3. हरभरा आणि गव्हावर पडणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेरोमोन सापळे आणि जैविक नियंत्रण यांचा वापर करू शकता. योग्य मार्गदर्शनाने फवारणी करावी.
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
1. वेळेची आणि खर्चाची बचत करण्यासाठी शेतकरी बांधवांनी ड्रोन फवारणी यंत्र शेतात वापरले पाहिजे. उंच, मोठ्या आणि दाट पिकांवर फवारणी करणे खूप सोपे होते आणि पिकांना एकसमान पद्धतीने फवारणी केली जाते.
यामुळे शेतकरी बांधवांच्या वेळेची बचत होते आणि मजुरीतही ही बचत होते.
2. शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीत बदल करायला पाहिजे. ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) या सारख्या सिंचन पद्धती वापरून कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवू शकतात.
आता सध्या शेतकरी आपल्या शेतात मोबाईल अॅप्स किंवा IoT आधारित यंत्रणांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे दूर ठिकाणाहून सुद्धा सिंचन प्रणाली हाताळू शकतात. या सुविधांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच, पण त्यासोबत पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळेल.
फक्त पिकाला पाणी मिळाल्यामुळे पिकाची वाढ होते, शेतात तण हे जास्त उगवत नाही. ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा भागांमध्ये ही तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न देणारी शेती करू शकतो.
3. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जमिनीत असलेल्या पोषक घटकांचा अंदाज लागतो, जेणेकरून तुम्ही अतिरिक्त खतांचा वापर टाळू शकता.
रासायनिक खतांचा कमी वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. योग्य प्रमाणात खत वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होतेच, पण शेतीसाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होते.
4. पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा आणि इतर यंत्रांचा वापर करून तुम्ही शेतात पेरणी करावी, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि योग्य पद्धतीने शेतात पेरणी होईल.
टीप
पेरणीकरण्या अगोदर शेतकरी बांधवांनो हवामानाचा अंदाज आणि पाण्याची सोय पाहून पेरणी करावी आणि तुम्हाला पिकाविषयी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.
निष्कर्ष (Conclusion)
रब्बी हंगामात पिकांचे योग्य नियोजन कसे करावे त्या विषयी आपण पहिले. शेतकरी मित्रांनो, या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे रब्बी पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. म्हणून रब्बी पिकांचे म्हणजे गहू आणि हरभरा पिकांचे योग्य नियोजन केले तर तुम्हाला चांगले उत्पादन पाहायला मिळेल.