विशाल लांडगेच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा प्रवास
आज देशातील कोणत्याही खेडेगावात जा आणि विचारा तुमच्या मुलाला किंवा स्वतः तरुणांना विचारा की तुम्ही तुमची वडिलोपार्जित शेती व्यवसाय पुढे असाच सुरू ठेवणार की शिक्षण करून नोकरीसाठी शहरात जाणार. या प्रश्नावर प्रत्येक ग्रामीण भागातून एकच उत्तर मिळेल. शेती परवडत नाही, त्यापेक्षा कुठे तरी कमी पगाराची का असेना, पण नोकरी हवी.
हेच विचार जामवाडी गावातील विशाल लांडगे या तरुणाची आणि त्याच्या परिवाराची होती. त्यानुसार त्याने त्याचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि जवळ असलेल्या जिल्ह्यात एका खाजगी बँकेतसुद्धा कामाला लागला. काम चालू झाले, रोज बँकेचे टार्गेट मिळू लागले, ते पूर्ण करण्याच्या धावपळीत आयुष्याचे ७ वर्ष त्याने बँकेत सेवा दिली.
पण नोकरीत मन काही लागले नाही. त्याने विचार केला, बँकेचे टार्गेट पूर्ण करण्यापेक्षा आपला स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू करून तिथेच मेहनत करू आणि टार्गेट पूर्ण करू, याच निश्चयाने त्याने कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. कुक्कुटपालन व्यवसाय निवडण्यामध्ये त्यांनी कारण सांगितले.
या आधी त्यांनी गावरान कोंबड्याचा व्यवसाय आधीच केला होता. कारण गावांमध्ये शेतीपालन, कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात केले जातात, पण ते छोट्या स्वरूपात. विशाल यांना कुक्कुटपालनाचा अनुभव असल्याने त्यांनी हा व्यवसाय निवडला आणि पाणी सुरुवातीला त्यांच्या गावातून १०-१५ चांगल्या जातीच्या गावरान कोंबड्या जमा केल्या आणि त्यांच्या जवळ ५० कोंबड्या जमल्यानंतर त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. आणि ते या व्यवसायात यशस्वी झाले आहेत.
कुक्कुटपालन व्यवसायासाठी विशाल यांना लागलेले भांडवल
विशाल याना व्यवसायात जुना अनुभव होता पण तो कमी होता. त्यांना हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अगोदर ७ ते ८ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. त्यात त्यांनी कोंबड्यांसाठी कुंपण तयार केले. विजेची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली,
त्यासोबत त्यांनी स्वतःची हॅचरी सुद्धा सुरु केली. आधी त्यांनी ५०-७० कोंबड्या आणल्या आणि त्यांच्या पासून सुरुवात केली. त्यामधूनच त्यांना अनुभव येत गेला आणि आज ते कुक्कुटपालनात यशस्वी व्यावसायिक आहेत.
विशाल लांडगेची स्वतःची हॅचरी, त्यामधून ही भरघोस कमाई
ज्यांनी हॅचरी हा शब्द ऐकला नसेल त्यांना याचा अर्थ समजणार नाही. आज आपण पाहू हॅचरी म्हणजे काय आणि हॅचरीचा वापर करून विशाल कशा पद्धतीने कमवत आहेत पैसे. मित्रांनो, हॅचरी म्हणजे कोंबड्यांची अंडी उबवून त्या पासून पिल्ले तयार करण्याच्या प्रक्रियेला किंवा त्यासाठी तयार केलेल्या जागेला हॅचरी म्हणतात.
इथे कोंबड्यांची अंडी एका विशेष नियंत्रित तापमानात आणि आद्रतेमध्ये इनक्युबेटरच्या मदतीने उबवली जातात. त्यामुळे कोंबड्यांची पिल्ले ही योग्य वेळेत अंड्यांमधून बाहेर पडतात.
याच हॅचरीचा वापर करून विशाल हे महिन्याला ७०० ते ८०० पिलांची निर्मिती करत असतात. विशाल हे प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे पक्षी तयार करून विकतात. ते एक पक्षी १५० रुपये प्रमाणे विकतात. त्यांच्या हॅचरीमध्ये तयार होणाऱ्या पिलांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मागणी आहे.
कुक्कुटपालनातून मिळणारे वार्षिक उत्पन्न
विशाल हे प्रत्येक महिन्याला १ लाख रुपये कुक्कुटपालन व्यवसायातून कमवत असतात. ते त्यांच्या हॅचरीमध्ये तयार झालेली पिल्ले विकतात. एक पक्षी ते १५० रुपयांना विकतात. त्यासोबत ते अंडी विकतात. गावरान अंडींची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. त्यासोबत विशाल हे कोंबड्या सुद्धा विकतात. या सर्वांमधून त्यांना महिन्याला १ लाख रुपये निघत असतात.
विशाल लांडगे यांचा तरुणांना संदेश
तरुण कुक्कुटपालन व्यवसायात सुरु करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी आधी २० ते २५ कोंबड्यांपासून व्यवसायाची सुरुवात करावी. किंवा १०० ते १५० पिकांपासून देखील तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात करू शकता. यामधून मिळणाऱ्या अनुभवाने पुढे तुम्ही व्यवसाय वाढवत जा.
जेणेकरून तुमचे नुकसान कमी होईल आणि अनुभवामुळे तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होताना दिसेल. कोणताही व्यवसाय करताना तुमचे प्रामाणिक कष्ट, प्रयत्न आणि तुमच्या व्यवसायाविषयी काटेकोर नियोजन केले असता नक्कीच तुम्हाला याचा आर्थिक फायदा पाहायला मिळेल. असे विशाल लांडगे राज्यातील आणि देशातील युवा व्यावसायिकांना सांगतात.