CIBIL Score म्हणजे काय?
CIBIL Score हा तीन अंकी क्रमांक असतो. त्याला क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे तयार केलेला असतो. स्कोर साधारण ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो आणि या दोन्ही अंकांमधील नंबर हा तुमचा सिबिल स्कोर असतो. हा स्कोर तुमच्या भूतकाळातील आर्थिक व्यवहारावर आधारित असतो.
तुम्ही बँकांकडून घेतलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर कशा पद्धतीने करता. तुम्ही घेतलेले कर्ज योग्य वेळेत भरता की नाही. क्रेडिट कार्डचा वापर आणि त्याचे बिल वेळेवर भरता की नाही. या सर्व डेटावरून तुमचा सिबिल स्कोर ठरत असतो. कोणत्याही व्यवहारासाठी ७५० पेक्षा अधिक स्कोर हा उत्तम मानला जातो.
CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी काय करावे?
सिबिल स्कोर चांगला ठेवणे किंवा त्याला सुधारणे हे सर्व तुमच्या हातात आहे; तुमचे चांगले आर्थिक नियोजन, खर्च करण्याची सवय आणि व्यवहारातील शिस्त या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. आपण काही टिप्स विषयी चर्चा करू जेणेकरून तुमचा CIBIL Score चांगला ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल.
1. कर्जाची परतफेड
बँकेतून घेतलेले कर्ज असो किंवा आपण वापरलेल्या क्रेडिट कार्डचे बिल, यांना प्रत्येक महिन्याला फेडण्याची एक तारीख ठरवलेली असते. त्या तारखेलाच पैसे भरले गेले पाहिजेत. तुम्ही पैसे भरायला विलंब केला तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
सिबिल स्कोरच्या १००% मधून ३५% भाग हा तुमच्या मागील परतफेडवर ठरवला जातो. तुम्हाला हफ्ते भरण्याची तारीख लक्षात राहत नसेल तर ऑटोमॅटिक पेमेंट विकल्प सेट करा. जेणेकरून दरमहा तुम्हाला आठवण ठेवण्याची गरज राहणार नाही.
2. क्रेडिट कार्डचा वाप
तज्ज्ञांच्या मते क्रेडिट कार्ड वापरण्याची एक मर्यादा असते. कंपनी आपल्याला २ लाख, ३ लाख रुपयांची लिमिट देते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्ण लिमिट संपेपर्यंत कार्डचा वापर करावा. तुमच्या क्रेडिट कार्डच्या दिलेल्या लिमिटमधून फक्त ३०% पर्यंत वापर करावा.
उदा. कंपनीने तुम्हाला तुमच्या कार्डवर १ लाख रुपयांची लिमिट दिली असेल तर तुम्ही फक्त ३० हजार रुपये खर्च केले पाहिजे. तुम्ही या पेक्षा जास्त खर्च केले तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. कार्डचा जास्त वापर केल्याने कंपनी असे गृहीत धरते की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, ज्यामुळे तुमचा स्कोर कमी होतो.
3. नवीन कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेणे टाळा
तुम्हाला खरोखरच कर्जाची गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा. किंवा तुमच्या कडे क्रेडिट कार्ड असेल तर दुसऱ्या कार्डसाठी अर्ज करणे टाळा. तुम्ही विनाकारण कर्जासाठी आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर बँक किंवा वित्तीय संस्था CIBIL कडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासते.
तुम्ही कर्जासाठी आणि कार्डसाठी पात्र आहेत की नाही. या प्रक्रियेदरम्यान तुमच्या अर्जाची नोंदणी सिबिल रिपोर्टमध्ये केली जाते. त्यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.
4. जुन्या खात्यांचा वापर बंद करू नका
CIBIL Score म्हणजे आपल्या व्यवहारांचा क्रेडिट इतिहास असतो. आणि हा आपल्या सिबिल स्कोरमध्ये 15% प्रभाव टाकणारा घटक मानला जातो. त्यामुळे आपली जुनी क्रेडिट कार्ड किंवा कर्ज खाती बंद करू नका. जितका जास्त क्रेडिट इतिहास असेल, तेवढा जास्त सिबिल स्कोअर चांगला असतो.
तुम्ही जुनी खाती बंद केली, तर तुमचा क्रेडिट इतिहास पुसला जाईल आणि तुम्हाला पुन्हा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणून सिबिल स्कोर मेंटेन ठेवण्यासाठी जुने खाती चालू राहू द्या.
5. क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी तपासता जा
CIBIL च्या अधिकृत वेबसाइटवरून सिबिल स्कोर रिपोर्ट मिळवा आणि वेळोवेळी त्याला तपासा. त्या रिपोर्टमध्ये कर्जविषयी किंवा पेमेंटविषयी चुकीच्या नोंद असतील तर त्यांना दुरुस्त करून घ्या. तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमचा रिपोर्ट तपासा.
6. एकाच प्रकारचे कर्ज घेऊ नका
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी कर्ज लागणार आहे, त्याचेच कर्ज घ्या. तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा वैयक्तिक कर्जावर (Personal Loan) अवलंबून राहू नका. म्हणजे तुम्हाला घर विकत घ्यायचे आहे तर गृहकर्ज (Home Loan), तुम्हाला वाहन खरेदी करायचे आहे तर वाहन कर्ज (Vehicle Loan) घ्या,
तुमच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल तर शैक्षणिक कर्ज (Education Loan) घ्या. याने तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यास मदत होते. तुम्ही सर्व गोष्टींसाठी एकाच प्रकारचे कर्ज घेत गेलात तर त्याने रिपोर्टमध्ये एकाच कर्जाची नोंद होईल आणि याचा परिणाम हा तुमच्या सिबिल स्कोरवरसुद्धा पाहायला मिळेल.
7. कर्जाचा डोंगर चढवू नका
तुमच्यावर जास्त कर्ज असेल तर कर्ज-ते-उत्पन्न प्रमाण Debt-to-Income Ratio (DTI) तुमच्या सिबिल स्कोरवर परिणाम करते. म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त कर्ज असेल तर बँका आणि वित्तीय संस्था तुम्हाला जोखमीच्या यादीत ठेवतात.
त्यामुळे हळूहळू कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून Debt-to-Income Ratio च्याामुळे तुमचा स्कोर खराब होणार नाही. आणि भविष्यात तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेण्यास अडचण येणार नाही.
तुमचा CIBIL Score किती आहे, कसा तपासायचा?
अजून तुम्हाला तुमचा CIBIL Score माहिती नसेल, तर तो तपासणे खूप सोपे आहे. तुम्ही आता विविध अॅप आणि वेबसाइटचा वापर करून तपासू शकता. त्यात सोपा मार्ग म्हणजे "गूगल पे" सुद्धा तुम्ही तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता.
आणखी दुसरा मार्ग सिबिलच्या अधिकृत वेबसाइटवर जा, त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: www.cibil.com. इथे आधी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर माहिती देऊन नोंदणी करून घ्या. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासू शकता. काहीवेळेस सिबिल स्कोर बँका आणि आर्थिक संस्थाही तुम्हाला तुमचा स्कोर मोफत उपलब्ध करून देतात.
👉 सिबिल स्कोर ३०० ते ५४९ च्या आत असेल तर त्याला "खराब स्कोर" (Poor Score) म्हणतात, यात तुम्हाला कर्ज मिळणे कठीण असते.
👉 सिबिल स्कोर ५५० ते ६४९ च्या आत असेल तर त्याला "सरासरी स्कोर" (Average Score) म्हणतात, यात तुम्हाला स्कोर सुधारण्याची आवश्यकता आहे.
👉 सिबिल स्कोर ६५० ते ७४९ च्या आत असेल तर त्याला "चांगला स्कोर" (Good Score) म्हणतात, यात तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.
👉 सिबिल स्कोर ७५० ते ९०० च्या आत असेल तर त्याला "उत्कृष्ट स्कोर" (Excellent Score) म्हणतात, यात तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते.