टीडीएस (TDS) नियमांमधील बदलांचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार?
सोप्या भाषेत सांगायला गेले तर टीडीएस (TDS) म्हणजे तुमच्या उत्पन्नातून सरकार ठराविक कर करून घेते, त्याला टीडीएस म्हणतात. टीडीएस पद्धतीमुळे वर्षअखेरीस करदात्यांना कराचा मोठा बोजा टाळता येतो. कारण टॅक्सची रक्कम एकसाथ भरताना तुमचे अर्थगणित बिघडू शकते.
पण काहीवेळा लहान उत्पन्नावरही कर कापला जातो, ज्यामुळे नागरिकांना त्रास होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक स्थिती सुधरावी यासाठी नव्या नियमांमध्ये अनेक सूट देण्यात आले आहेत. त्यासोबत काही गोष्टींमध्ये मर्यादा वाढवल्या आहेत.
यामुळे देशातील करदाते, लहान गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिक आणि कमिशन एजंटांना नवीन नियमांमुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे. या नवीन बदलांचा परिणाम देशातील करोडो लोकांच्या खिशावर होणार आहे, कारण नवीन नियमानुसार आता तुमच्या हातात येणारी रक्कम वाढेल.
गुंतवणूकदारांना लाभ आणि म्युच्युअल फंडवरील कमाईवर टीडीएस सवलत
देशात नोकरदारवर्ग खूप मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण यापासून येणाऱ्या उत्पन्नावर सरकार टीडीएस लावत असे, यामुळे गुंतवणूकदारांना कमी नफा मिळत असे. आता सरकारने शेअर्सवर मिळणारे डिव्हिडंट इन्कम आणि म्युच्युअल फंड युनिट्समधून कमाईवर अधिक सूट देण्याचा निर्णय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये घेण्यात आला.
१ एप्रिलपासून हे नियम लागू होतील. आधी शेअर्सच्या डिव्हिडंट इन्कम आणि म्युच्युअल फंडच्या इन्कमवर ५,००० रुपयांची सूट देण्यात आली होती. म्हणजे ५,००० रुपयांच्या आतील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचे टॅक्स सरकारला देण्याची गरज नव्हती. पण ५,००० वरील इन्कमवर टीडीएस कापला जात होता. आता याची मर्यादा १०,००० रुपयांपर्यंत केली आहे.
जर तुम्हाला तुमच्या शेअर्सवरील डिव्हिडंट इन्कम किंवा म्युच्युअल फंडातून मिळालेला लाभ १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या उत्पन्नावर सरकार आता कोणताही टीडीएस कापणार नाही. ही सूट मिळाल्याने देशातील गुंतवणूकदारांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिक हिस्सा हातात मिळेल आणि त्यांच्यावर कराचा बोजा कमी होईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसमध्ये विशेष सूट
देशातील जेष्ठ नागरिक आयुष्यभराची जमा पुंजी त्यांचे भविष्य सुखरुप जावे म्हणून त्यांची सेविंग बँकांमधील फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रेकरिंग डिपॉझिट (RD) मध्ये ठेवतात आणि त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा खर्च भागवत असतात. पण बँका या उपत्पन्नावर आधीच टीडीएस कापून घेतात.
टीडीएस कापल्यामुळे जेष्ठ नागरिकांचे आर्थिक गणित बिगडत असे. सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी त्यांच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरील टीडीएस सूट मर्यादा दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता १ एप्रिल २०२५ पासून देशातील ज्येष्ठ नागरिकांचे ठेवीवर वार्षिक व्याज उत्पन्न जर १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या उपत्पन्नावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही.
१ एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिट आणि रेकरिंग डिपॉझिट ठेवीवर वार्षिक व्याज १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, अतिरिक्त रकमेवरच टीडीएस लागू होईल. आपण हे एक उदाहरणाने पाहू. समजा देशातील एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या ठेवीवर वर्षभरात १,२०,००० रुपये व्याज मिळाले, तर फक्त २०,००० रुपयांवरच टीडीएस कापला जाईल. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बचतीवर अधिक परतावा मिळेल आणि त्यांचा आर्थिक ताण कमी होईल.
६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांसाठीसुद्धा आर्थिक दिलासा
देशातील ज्येष्ठ नागरिकांना टीडीएसमध्ये सवलत दिल्यानंतर आता देशातील ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या करदाता नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने व्याज उत्पन्नावरील टीडीएस (TDS) सूट मर्यादेत वाढ केली आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार तुमचे वार्षिक व्याज उत्पन्न ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर सरकार त्यावर टीडीएस (TDS) कापणार नाही.
जर तुमच्या ठेवीवर व्याज उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तरच त्यावर टीडीएस लागू होईल. आणि सरकार टीडीएस (TDS) कापणार. उदाहरणार्थ, बँकेच्या बचत खात्यातून किंवा एफडीतून तुम्हाला ४५ हजार रुपये व्याज मिळाले, तर तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल; या रकमेवर १ रुपया सुद्धा टीडीएस लागणार नाही. हा नवीन बदल विशेषतः देशातील तरुण गुंतवणूकदार आणि तरुण वयापासून बचत करणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगवरील टीडीएस नियमांमध्ये बदल
सरकारने लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगमधून उत्पन्न मिळणाऱ्या नागरिकांसाठी टीडीएस नियमांमध्ये बदल केले आहेत. जर तुम्ही १ एप्रिल २०२५ आधी एका आर्थिक वर्षात १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली, तर जिंकलेल्या रकमेवर टीडीएस लागू होत होता.
आता तुम्ही एकाच व्यवहारात १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली, तर टीडीएस कापला जाईल. तुम्ही वर्षभरात सिंगल ट्रान्झॅक्शनमधून १० हजारपेक्षा कमी रक्कम जिंकली आणि छोट्या-छोट्या रकमा जिंकल्या त्या १० हजारपेक्षा जास्त झाल्या, तरीही तुमचा प्रत्येक व्यवहार १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल.
अशा रकमेवर टीडीएस लागणार नाही. यामुळे देशातील जे नागरिक लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगद्वारे उत्पन्न कमवतात, त्यांना त्यांच्या उत्पन्नावरील टीडीएसचा बोजा कमी होईल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
विमा आणि ब्रोकरेज कमिशनवरील टीडीएस मर्यादेत वाढ
देशात अनेक लोक स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विमा कमिशन व ब्रोकरेजच काम करत असतात. सरकार या मधून येणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस कट करत असते. आधी कमिशन व ब्रोकरेजमधून मिळणाऱ्या १५ हजार वरील उत्पन्नावर टीडीएस कापला जात होता. आता उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
आता २० हजार रुपयांपर्यंतच्या कमिशनवर टीडीएस कापला जाणार नाही. आपण एका उदारहरणातून समजू, जर तुम्ही विमा पॉलिसी विक्री करून किंवा ब्रोकरेजमधून २०,००० रुपयांपर्यंत कमिशन मिळवले, तर त्या उत्पन्नावर सरकार कोणत्याही प्रकारचा टीडीएस कापणार नाही. पण २० हजारपेक्षा कमिशन जास्त असेल तर फक्त अतिरिक्त कमिशनवर तुम्हाला टीडीएस लागू होईल. या नवीन बदलामुळे विमा एजंट आणि ब्रोकर्ससाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.