सातबारा उताऱ्याविषयी थोडक्यात
७/१२ (सातबारा) म्हंटला म्हणजे हे दोन कलम (गाव नमुना) आहेत. एक कलम ७ (गाव नमुना ७) आणि कलम १२ (गाव नमुना १२) असे म्हंटले जाते. कलम ७ मध्ये तुमच्या जमिनीच्या हक्काविषयी माहिती असते. त्यासोबत तुमच्या शेतीचा गट क्रमांक, शेतीचे एकूण किती क्षेत्र आहे,
तुमच्या जमिनीत कोणी अन्य हक्क आहेत का, तुमच्या शेताचे नाव, शेतीच्या भोगवटदाराचे नाव, त्यानंतर कुळ असेल तर कुळाचे नाव, लागवडीखालील क्षेत्र, शेतीचे पोटखराबी क्षेत्र, जिरायती-बागायतीचा प्रकार, असे उल्लेख गाव नमुना ७ मध्ये असतात.
कलम १२ (गाव नमुना १२) म्हणजे गाव नमुना यामध्ये शेतीमधील जमिनीवर किती क्षेत्रावर तुम्ही लागवड केली आहे आणि किती क्षेत्र पळीत आहे. या गाव नमुना १२ वरून समजते. शेतकरी मित्रांनो, याच उताऱ्यावर आपण पीक पाहणी लावत असतो.
सातबारा उताऱ्यात केलेले ११ नवीन बदल
गावाचा कोड क्रमांक गावाच्या नावासोबत जोडला जाणार आहे.
कलम ७ म्हणजे गाव नमुना ७ मध्ये तुमच्या गावाच्या नावासमोर तुमच्या गावाचा कोड नंबर टाकण्यात येणार आहे. (राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक गावाला एक विशिष्ट गाव क्रमांक दिला आहे. तोच क्रमांक आता उताऱ्यावर सुद्धा दिसणार आहे.)
लागवड योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्राविषयी स्पष्ट माहिती.
तुमच्या शेतजमिनीतील लागवड योग्य क्षेत्र (शेतकरी त्या जमिनीत पीक उगवतो ते क्षेत्र) आणि पोटखराब क्षेत्र (शेतात जी जागा पळीत असते. त्या जागेत विहीर असू शकते, दगड, खडक, गुरांच्या चारण्यासाठी सोडलेली जागा; त्यात कोणतेही पीक घेतले जात नाही अशी जमीन) अशी दोन्ही क्षेत्रे स्वतंत्र दाखवली जाणार आहेत. आणि त्यांच्या समोर दोघांची एकूण बेरीज दाखवली जाईल.
तुमच्या जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी नवीन मापन पद्धत
आता शेती क्षेत्र आणि बिनशेती क्षेत्र मोजण्यासाठी दोन वेगवेगळ्या एककांचा वापर करण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरले जाणार आहे. (शेती क्षेत्र म्हणजे ज्या जमिनीवर शेती केली जाते.)
बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरले जाणार आहे. (बिनशेती क्षेत्र म्हणजे जे क्षेत्र शेतीसाठी वापरले जात नाही. उदाहरणार्थ रहिवासी जमीन, व्यावसायिक इमारती, कारखाने, रस्ते, मोकळी जमीन इत्यादी.)
खाते क्रमांकाबद्दल स्पष्ट माहिती
पूर्वी शेतकऱ्यांचे खाते क्रमांक (खाते नंबर) हे ‘इतर हक्क’ (Other Rights) या रखान्यात नमूद असायचे, आणि खातेधारकाचे नाव वेगळ्या जागी दिसायचे, यामुळे कधी कधी खाते क्रमांक आणि खातेधारक शोधायला अडचण यायची. म्हणून आता खातेदाराच्या नावासमोर स्पष्ट दिसणाऱ्या अक्षरात खाते क्रमांक दिला जाणार आहे.
नोंदी लिहिण्याच्या पद्धतीत बदल
पूर्वी मृत व्यक्ती, कर्ज बोजे आणि इतर नोंदी कंसात त्या खातेदाराच्या नावासमोर दर्शवली जायायची. सरकारने या लिहिण्याच्या प्रकारात बदल केला असून आता नवीन बदलानुसार कंसाऐवजी नावावर ठळक आडवी रेष मारली जाणार आहे. जेणेकरून समोरील व्यक्तीस समजण्यास सोपे जाईल.
प्रलंबित फेरफार म्हणून नवीन रकाना
ज्या जमिनींचे फेरफार प्रलंबित किंवा प्रक्रिया पूर्ण नाही झाल्या आहेत, म्हणजे महसूल विभागाचे कर्मचारी त्यांची पडताळणी करत आहेत, अशा सर्व प्रलंबित नोंदणीसाठी एक स्वतंत्र रकाना तयात केला आहे. त्याला ‘प्रलंबित फेरफार’ असे नाव दिले असून सर्व प्रलंबित फेरफार या रकान्यात नमूद करण्यात येणार आहेत.
जुने फेरफार दर्शवण्यासाठी “जुने फेरफार क्रमांक” म्हणून नवीन रकाना
जुने फेरफार क्रमांक आता नवीन रकान्यात दाखवण्यात येणार आहेत, त्यासाठी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नावाने नवीन रकाना तयार करण्यात आला आहे.
खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा
नवीन नियमांनुसार एका नंबरसोबत दोन खातेदारांची नावे असतील तर त्या नावांमध्ये घोळ होऊ नये म्हणून या पुढे दोघी खातेदारांच्या नावामध्ये एक ठळक रेष काढण्यात येणार आहे. त्यामुळे उताऱ्यावर खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल.
शेवटच्या फेरफाराविषयी सविस्तर माहिती
तुमच्या खात्यावरील शेवटचा फेरफार हा ‘इतर हक्क’ रखाण्याच्या शेवटी दाखवण्यात येणार आहे. त्यात शेतीविषयी करण्यात आलेल्या शेवटच्या फेरफार विषयी म्हणजे फेरफार नंबर आणि त्याची तारीख नमूद करण्यात येणार आहे.
बिनशेती उताऱ्यासाठी नवीन मापन (एकक)
बिनशेती 7/12 उताऱ्यासाठी नवीन एकक ‘आर चौरस मीटर’ असणार आहे. या उताऱ्यामध्ये आता जुडी व विशेष आकारणी आणि इतर १-२ रकाने महसूल विभागामार्फत नवीन उताऱ्यातून काढून टाकण्यात आले आहेत.
बिनशेती उताऱ्यासाठी नवीन सूचना
शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बिगरशेतीच्या सातबारा उताऱ्यावर शेवटी ‘सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-१२ ची गरज नाही’ असा शेरा मारून सूचना देण्यात येणार आहेत.
निष्कर्ष (Conclusion)
सातबारा मध्ये करण्यात आलेल्या नवीन बदलांमुळे आता ७/१२ समजण्यास खूप सोपा जाणार आहे. सध्याच्या सातबारा मध्ये खाते धारकाची माहिती त्यासोबत मागील अपूर्ण आणि पूर्ण फेरफार, मृत व्यक्तींची माहिती या सारख्या गोष्टी समजण्यास थोडी अडचण येत असे; पण महसूल खात्याद्वारे करण्यात आलेल्या बदलांमुळे आता सोपे जाणार आहे.