मेहनतीचे फळं – ७० गुंठ्यातून मिळवले दहा लाखांचं उत्पन्न
किशोर वडचकर यांनी केवळ ७० गुंठे क्षेत्रावर तुती लागवड केली आणि त्यातून २०२४-२५ या वर्षात त्यांना तब्बल १५१२.३ किलो कोष उत्पादन मिळालं. यातून १५२ किलो डागी डबल पोचट माल मिळाला, जो उत्कृष्ट दर्जाचा मानला जातो.
आतापर्यंत त्यांनी ८ बॅच पार पाडल्या असून त्यांना कमीत कमी ४७० रुपये तर जास्तीत जास्त ७३० रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. बाजारभाव सरासरी ५५० रुपये प्रतिकिलो होता. काही बॅचमध्ये ७३० रुपयांचाही दर मिळाला आहे.
चांगल्या दर्जाच्या मालातून त्यांनी आत्तापर्यंत एकूण उत्पन्न ८ लाख ४१ हजार २१९ रुपये आणि येणाऱ्या बॅचमधून बाकीचं उत्पन्न मिळून दहा लाख रुपयांचा टप्पा पार होणारच, असा विश्वास किशोर यांनी व्यक्त केला.
कुटुंबच सांभाळते व्यवस्थापन
या यशस्वी शेतीमागे वडचकर कुटुंबाची मेहनत आणि योग्य व्यवस्थापन आहे.
सुरुवातीला, किशोर यांनी ३ लाख खर्च करून २६x७२ फुटांचं शेड तयार केलं आणि वार्षिक २ लाख रुपये खर्च करून ते सातत्याने उत्पन्न घेत आहेत.
किशोर, त्यांच्या पत्नी राणी, आई सुनंदा आणि वडील सिद्धेश्वर – हे चौघं मिळून रेशीम शेतीचं संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सहभाग हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे.
अवर्षणातही रेशीम शेतीने दिला हात
किशोर वडचकर आपल्या शेतात ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेतात. या वर्षी पावसाने खरीप हंगामात पाठ फिरवली आहे.यंदा खरीप हंगामात अजून त्यांची पेरणीही बाकी आहे. आणि त्यासोबत कुप्पा परिसरात अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
अशा बिकट परिस्थितीत, किशोर यांना रेशीम शेतीने खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. रेशीम शेतीला पाण्याची कमी गरज असल्याने आणि वर्षभरात अनेक वेळा उत्पन्न मिळत असल्याने, त्यांनी या अवर्षणाच्या काळातही आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायक आदर्श
किशोर वडचकर यांचं यश हे सांगतं की, शेतकऱ्यांनी जर नव्या मार्गाने आणि योग्य नियोजनाने मेहनत घेतली, तर यश मिळवणं अशक्य नाही. नवरा-बायको आणि आई-वडील, अशा या दोन जोड्यांनी घेतलेल्या परिश्रमातून ते आज 'दशलक्षपती' बनले आहेत. त्यांच्या मेहनतीचा आणि दूरदृष्टीचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही नक्कीच घ्यायला हवा.
तुम्हालाही वाटतं का बदल घडवायचा?
तर रेशीम शेती, तुती लागवड, किंवा शेड व्यवस्थापनाविषयी अधिक माहिती हवी असल्यास, नक्की विचारणा करा – कारण आजचा निर्णय उद्याचं भविष्य घडवतो