Goat Farming: शेळीपालन आणि पोषण व्यवस्थापनातून शेळीपालनात उत्पन्नवाढ शक्य

शेळीपालन आणि पर्यटन यामध्ये नवीन संधी

आपण शेळीपालन व्यवसाय हा केवळ मांस, दूध आणि लेंडीखत यापुरता मर्यादित म्हणून पाहतो किंवा आपल्याला माहिती आहे. पण या व्यतिरिक्त शेळीपालनाला पर्यटनाशी जोडले गेले आहे, ग्रामीण आणि डोंगराळ भागातील आदिवासी वस्त्यांमध्ये नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात.

आपण एक लहान उदाहरण पाहू, ज्या आदिवासी भागांमध्ये जास्त शेळीपालन होते, त्या केंद्रांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाऊ शकते. मग तिथे लोकांना शेळीपालनाचे प्रशिक्षण, स्थानिक पातळीवर उत्पादनांची विक्री आणि शहरी लोकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकतो. यामुळे तेथील लोकांना थेट उत्पन्न मिळेल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

अकोले तालुक्यातील आमदार डॉ. किरण लहामटे यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजाला शेळीपालनासोबत व्यावसायिक शेळीपालन करण्याचे आवाहन केले आहे. "शेळीपालन आणि पर्यटनाला योग्य चालना दिल्यास आदिवासी भागात नवे रोजगार तयार होतील.

शेळीपालन करणाऱ्या लोकांनी त्यांच्या शेडमधील शेळ्यांच्या आरोग्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पोषण व्यवस्थापन नीट केल्यास या व्यवसायातून त्यांना त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते." त्यांच्या या मतातून शेळीपालन व्यवसायाच्या संधी आणि आव्हानांची जाणीव होताना दिसते.

शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण

शेळीपालन व्यवसाय हा ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी नफ्याचा व्यवसाय ठरू शकतो, पण त्यासाठी त्यांना योग्य तंत्रज्ञान आणि शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यासोबत त्याचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय (शिरवळ, जि. सातारा), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर आणि राष्ट्रीय मांस संशोधन संस्था आणि पशुसंवर्धन विभागातर्फे शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेळीपालन करणाऱ्या आणि इतर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन आणि कशा प्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता याबद्दल सांगण्यात आले.

कार्यक्रमातील मान्यवर आणि त्यांचे योगदान

या प्रशिक्षण कार्यक्रमाला अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि त्यांच्यासोबत राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुखदेव बारबुद्धे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमांत "माफसू"चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने सर यांनी अध्यक्षपदाची भूमिका बजावली.

याशिवाय ‘माफसू’चे कार्यकारिणी सदस्य हृषीकेश खांदे पाटील, डॉ. विकास वासकर (सहयोगी अधिष्ठाता), डॉ. योगेश गाडेकर (वरिष्ठ शास्त्रज्ञ), डॉ. दशरथ दिघे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), डॉ. सुनील तुंबारे (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त), डॉ. बसवा रेड्डी (प्रमुख शास्त्रज्ञ), डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. तेजस शेंडे, डॉ. गोकूळ सोनवणे (कार्यक्रम समन्वयक), डॉ. अतुल पाटणे (साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन), डॉ. चंद्रशेखर मोटे आणि डॉ. अशोक धिंदळे (पशुधन विकास अधिकारी विस्तार) हे मान्यवर उपस्थित होते.

शेळीपालनात पोषण व्यवस्थापनाचे महत्त्व

शेतकऱ्यांना शेळीपालनात पोषण व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉ. सुखदेव बारबुद्धे यांनी सांगितले की, या व्यवसायातून अधिक नफा मिळवायचा असेल तर पोषण व्यवस्थापन हा शेळीपालनाचा कणा आहे. गोठ्यातील शेळ्यांना योग्य प्रमाणात दिला गेला तरच त्यांचे आरोग्य, वजन वाढ आणि उत्पादनक्षमता टिकून राहते.

पुढे डॉ. सुखदेव बारबुद्धे बोलले की, "शेळीपालन करायची असेल तर तुमच्या कडे चांगल्या जातीची बोकडांची पैदास असणे आवश्यक आहे. देशात राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेने मांसल पदार्थांची निर्मिती करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान तयार केले आहे. त्याचा वापर करून तुम्ही मूल्यवर्धित मांसल पदार्थांची निर्मिती करू शकता आणि अधिकचा नफा मिळवू शकता."

तर डॉ. अनिल भिकाने यांनी शेतकऱ्यांना शेळीपालनात नवीन तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला. ते म्हणाले, "गोठ्यातील गाभण शेळ्यांना पौष्टिक पशुखाद्य दिल्यास करडांचे जन्मतःचे वजन वाढेल, योग्य आहार नियोजनाने करडांच्या मृत्यूदर कमी करता येईल आणि त्यांची वाढ वेगाने होण्यास मदत होईल." अशा प्रकारे योग्य नियोजन केले असता शेळीपालनातून अधिक नफा आणि उत्पादन मिळवता येते.

शेळीपालनाचे फायदे

१. शेळीच्या दुधाला बाजारात मागणी आहे. शेळीच्या दुधात पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. शेळीच्या दुधापासून चीज, दही आणि इतर उत्पादने बनवून विकू शकतात आणि उत्पन्न वाढवू शकतात.
२. कोंबडयाच्या मासानंतर शेळीचे मांस हे बाजारात खूप मागणीचे आणि लोकप्रिय आहे. गोठ्यात चांगल्या प्रतीच्या बोकडांची पैदास आणि त्यांचे पोषण व्यवस्थापन केले असता, मांसाचे उत्पादन वाढते. याचा फायदा मोठ्या प्रमाणात आपल्याला होईल.
३. बाजारात सेंद्रिय खताची मागणी नेहमी असते. शेळीची लेंडी हे सेंद्रिय खतासाठी उत्तम आहे. याला विकून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो किंवा स्वतःच्या शेतात टाकून शेताचे उत्पन्न वाढवून नफा मिळवू शकतो.

शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन कसे करावे?

१. चांगल्या जातीच्या बोकड्यांचा वापर करून शेडमध्ये सशक्त करडे तयार करावीत. पैदास व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही स्थानिक जातींसोबतच संकरित जातींचा विचार करावा, जेणेकरून तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
२. शेळीपालनात आहार व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शेळ्यांना हिरवा चारा, कोरडा चारा आणि पशुखाद्य यांचे संतुलित मिश्रण दिले गेले पाहिजे. तुमच्या जवळ गाभण शेळ्या असतील तर त्यांचा आहाराकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. चांगला आहार देऊन करडांचे वजन वाढवावे.
३. गोठ्यात रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा किंवा होऊ नये यासाठी शेळीचे आरोग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी शेळ्यांचे नियमित लसीकरण, जंतनाशक औषधे आणि गोठ्याची स्वच्छ व्यवस्था ठेवावी. यामुळे गोठ्यात रोगांचा प्रसार कमी होतो.
४. करडांचे संगोपन करताना पहिल्या काही तासांत आईचे दूध (कोलोस्ट्रम) पाजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर कदरांच्या जलद वाढीसाठी संतुलित आणि पोषक आहार द्यावा. ज्यामुळे गोठ्यातील करडांची वाढ जलद आणि निरोगी होईल.

शेळीपालन व्यवसायात येणारे आव्हाने आणि उपाययोजना

शेळीपालन करताना शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात, जसे की दुष्काळामुळे चाऱ्याची कमतरता, अनियमित हवामान बदलामुळे रोगांचा त्रास आणि बाजारातील बदल. पण शेतकऱ्यांनी शेळीपालनाचे योग्य नियोजन केले तर या अडचणी सोडवता येतात.

✅ शेतकरी मित्रांनो, स्वतःच्या शेतात पशूंसाठी चार निर्माण करा. मका, ज्वारी, गवत यासारखे पीक घ्या, जेणेकरून तुमचा चाऱ्यावर लागणारा खर्च कमी होईल.
✅ तुमच्या शेडमध्ये लहान लहान विभाग बनवा. आजारी शेंड्यांना वेगळी व्यवस्था करा. त्यांची नियमित तपासणी आणि लसीकरण करत राहा. काही समस्या असल्यास नजीकच्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.
✅ शेतकऱ्यांनो, गावातील आणि तालुका बाजारावर अवलंबून न राहता, ऑनलाइन प्लॅटफॉर्म जसे (WhatsApp, Facebook, किंवा इतर ई-कॉमर्स वेब पोर्टल) चा वापर करा, त्यामुळे तुम्हाला अधिक ग्राहक मिळतील आणि नफा सुद्धा मिळेल.

शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश

शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा संवाद साधून जाण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शास्त्रीय शेळीपालनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी मुख्य पाहुण्याच्या हस्ते विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. तेजस शेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विकास वासकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले, डॉ. गोकूळ सोनवणे यांनी कार्यक्रमात प्रास्ताविक सादर केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. चंद्रशेखर मोटे यांनी पाहुण्यांचा आणि मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेळीपालनाच्या नव्या संधींबद्दल आणि त्यात येणाऱ्या नवीन आधुनिक पद्धतींबद्दल माहिती मिळाली. शेतकऱ्यांना आणि मुख्य शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेळीपालन अधिक फायदेशीर आणि यशस्वी कसे करावे याबद्दल अधिक शिकता आले.

शेळीपालन व्यवसायाचे भविष्य

व्यावसायिकांनी शेळीपालनाला शास्त्रीय दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने केले तर भविष्यात शेळीपालन हा अधिक फायद्याचा ठरू शकतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांनी सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे, जसे अनुसूचित जमाती उपघटक योजना, शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवण्यात येतात. अशा योजनांचा लाभ घेतला तर नक्कीच शेळीपालनाला व्यावसायिक स्वरूप देता येईल.